क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करा – अम्ब्रिशराव आत्राम

लगाम येथे रात्रकालीन क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी बॅटिंगचा आनंद अनुभवताना अम्ब्रिशराव आत्राम

मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथे ‘जय सेवा 750 क्रिकेट क्लब लगाम’ यांच्या सौजन्याने बाजारवाडी पटांगणात टेनिस बॉल (30 सर्कल) रात्रीकालीन क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. या सामन्यांचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्पर्धकांना संबोधित करताना ते म्हणाले, आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल असे अनेक खेळ मोठ्या उत्साहात खेळतात. आपल्या क्षेत्रातील युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत भरपूर गुणवत्ता आहे, त्यामुळे युवकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून प्रगती करावी आणि आपल्या क्षेत्राचा नावलौकिक वाढवावा, असे मत यावेळी अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.

या रात्रकालीन क्रिकेट सामन्याचे प्रथम पारितोषिक 20001 रुपये अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून, तर द्वितीय पारितोषिक 15001 रुपये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याकडून देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते संतोष उरेते,पोलिस पाटील गिरमाजी मडावी, अमित गोविंदवार, प्रमोद चांदावार, राजू सोनटक्के, संतोष मोहूर्ले, महादेव सिडाम तसेच युवा वर्ग, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.