गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात सुरू असलेली वाळूची वाहतूक आणि विक्री शासनाच्या परवानगीनुसार आणि नियमांनुसारच सुरू आहे. कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी परवानगी दिली असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.इम्रान शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे.
अंकिसामाल (ता.सिरोंचा) येथील स.क्र. 690, 691 मधील 2186 ब्रास आणि स.क्र. 908 मधील 7972 ब्रास रेतीसाठा विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे गौण खनिज विक्रीच्या नियमानुसार मंजूर केला आहे. तसेच, मद्दीकुंटा (ता.सिरोंचा) येथील स.क्र. 533 मधील 21,520 ब्रास मातीमिश्रित वाळू निष्कासन (उत्खनन) आणि वाहतुकीची परवानगी शेतजमीन लागवडीयोग्य करण्याच्या हेतूने शासन मान्यतेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली आहे. या साठ्यातील रेती मौजा अंकिसा येथे साठवण्यात आली असून, तेथून शासन नियमांनुसार नियमित विक्री केली जात आहे.
संबंधित रेतीसाठा खाजगी व्यक्तीच्या जमिनीत करण्यात आला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या महसुलाचे संरक्षण सुनिश्चित केले आहे. त्यामुळे त्यासंदर्भात कोणी गैरसमज करून घेऊ नये, असे डॅा.शेख यांनी स्पष्ट केले.