गडचिरोली व अहेरीत प्रत्येकी 14, तर आरमोरीत 12 उमेदवारांचे नामांकन वैध

माघार घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत

गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये दाखल झालेल्या एकूण 65 नामनिर्देशन अर्जांपैकी 13 अर्ज बाद होऊन 52 अर्ज वैध ठरले आहेत. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज केले होते. एकूण 40 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या 40 पैकी कोण-कोण निवडणुकीतून माघार घेणार याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. 4 नोव्हेंबर ही नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. गडचिरोली मतदार संघात 3 अर्ज बाद झाले. मात्र

त्या उमेदवारांनी आणखी दाखल केलेले अर्ज वैध ठरल्याने कोणीही उमेदवार बाद झालेला नाही. मात्र अहेरी आणि आरमोरी मतदार संघांमधून प्रत्येकी दोन उमेदवार बाद झाले. त्यामुळे आता आरमोरी मतदार संघात 12, गडचिरोलीत 14, तर अहेरीत 14 उमेदवार रिंगणात आहेत. नामांकन दाखल करण्याची

मुदत संपल्यानंतर बुधवारी तीनही विधानसभा मतदार संघातील अर्जांची छाननी संबंधित निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली. आरमोरी विधानसभा क्षेत्रात दामोधर तुकराम पेंदाम आणि निलेश छगनलाल कोडापे यांचे नामनिर्देशन बाद झाले. अहेरी विधानसभा मतदार

संघात आत्राम तनुश्री धर्मरावबाबा आणि पोरतेट ऋषी बोंदय्या या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. एबी फॉर्म विहित नमुन्यात सादर न केल्याने, तसेच नामनिर्देशन पत्रावर 10 सूचकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने हे अर्ज बाद ठरवण्यात आले.