लॅायड्सच्या काली रुग्णालयात जन्मले 4.63 किलोचे बाळ

सामान्य प्रसुतीतून घेतला जन्म

जन्मलेले बाळ आणि मातेसह रुग्णालयाची वैद्यकीय चमू.

एटापल्ली : जिल्ह्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयात तब्बल 4.63 किलो वजनाचे बाळ सिझेरियन न करता अगदी सामान्य प्रसुतीतून जन्माला आले. रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूने यातून आपली वैद्यकीय क्षमता आणि आरोग्य सेवेतील उत्कृष्टता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. एवढ्या वजनाचे बाळ सामान्य प्रसुतीतून जन्माला येण्याची ही या भागातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

हे बाळ आणि त्याची आई दोघेही सुरक्षित आहेत. सामान्यत: 4 किलो आणि त्याहून अधिक वजनाचे बाळ ‘मोठे’ मानले जातात. या प्रकरणात, बाळाचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथील सुंदरनगरची रहिवासी असलेल्या एका मधुमेह नसलेल्या आईच्या पोटी झाला. 27 जुलै रोजी लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात त्या महिलेने बाळाला जन्म दिला.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)चे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्याकडून रुग्णालयाच्या चमूला सतत प्रेरणा मिळते. दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यावर त्यांचा विशेष भर असतो. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालक कीर्ती रेड्डी यांचेही एलकेएएम रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूला मार्गदर्शन आणि पाठबळ असते. आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.

एलकेएएम रुग्णालयामधील डॉक्टरांच्या मते, ‘शोल्डर डायस्टोसिया’ (बाळंतपणात गर्भाचा खांदा मातेच्या गर्भाशयात अडकणे, ज्यामुळे बाळाला बाहेर येण्यास अडचणी निर्माण होतात) परिस्थिती असतानाही रुग्णालयाच्या तज्ज्ञ चमुने प्रसुती यशस्वीरित्या पार पाडली. यामुळे गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता दिसून आली.