दुकानाचे नाव मराठीत लिहा, अन्यथा दंडासह कारवाई

1 ऑक्टोबरपासून होणार कारवाई

गडचिरोली : उच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्य शासनाच्या राजपत्राचा हवाला देत गडचिरोली नगर परिषदेने शहराच्या हद्दीतील सर्व दुकाने, प्रतिष्ठानांवर मराठी पाट्या (बोर्ड) लावणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या दिसेल त्यांच्यावर 1 ऑक्टोबरपासून दंडात्मक आणि फौजदारी कारवाया सुरू केल्या जाणार असल्याचे पत्रक मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी जारी केले आहे.

राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या राजपत्रातील कलम 36 (क) मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवगागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे. यात सोबत इतर भाषेतील नामफलक लावता येईल पण सुरूवातीला मराठी भाषेत ठळकपणे नामफलक असणे बंधनकारक आहे.

त्यामुळे गडचिरोली नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यिक संस्था, हॅाटेल्स इत्यादींनी आपले नामफलक 30 सप्टेंबरपूर्वी मराठीत करून घ्यावेत. न केल्यास 1 ऑक्टोबरपासून 2 हजार रुपये दंड केला जाईल. दंड आकारल्यापासून 5 दिवसांत नामफलकाची दुरूस्ती न केल्यास संबंधित आस्थापनाधारकांवर महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना कायदा 2017, शासनाचे राजपत्र आणि उच्च न्यायालयाच्या 23 फेब्रुवारी 2023 च्या निर्णयानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी कळविले.