गडचिरोली : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 2022-23 या वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले. त्यात गोंडवाना विद्यापीठाने तीन पुरस्कार पटकावले. या विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूरच्या गडचांदूर येथील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आणि सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. याशिवाय याच विद्यापीठाअंतर्गत हरडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक हा पुरस्कार पटकावला आहे. याबद्दल शासनाकडून प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविले जाणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दिलेल्या भरीव योगदानाची आणि केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कारासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर (ता.कोरपना) येथील विद्यार्थी डॉ.शरद बापुराव बेलोरकर यांची निवड करण्यात आली.
सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयास जाहीर करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कारासाठी केवळराम हरडे महाविद्यालयाचा चामोर्शी (जि.गडचिरोली) विद्यार्थी अरबाज मुस्तफा शेख या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. रा.से.यो.चे संचालक डॉ.श्याम खंडारे यांनी कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट कार्य केल्याची ही पावती आहे. सदर पुरस्कार्थीचा शासनामार्फत प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन यथोचित सत्कार केला जाणार आहे.