गडचिरोली : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा ‘उत्कर्ष 2025-26’ मध्ये गोंडवाना विद्यापीठाने उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाची ‘सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय संघ’ म्हणून निवड करण्यात आली. त्यानिमित्त विद्यापीठास प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राज्यातील विविध विद्यापीठांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने शिस्त, संघभावना, वेळेचे काटेकोर पालन व सामाजिक जाणीव यांचे प्रभावी दर्शन घडविले. सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या राज्यस्तरीय मंचावर मिळालेला सन्मान गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे. स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत स्वयंसेवकांनी दाखविलेली शिस्तबद्ध व जबाबदार भूमिका आयोजक व परीक्षकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरली.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.श्याम खंडारे, संघ व्यवस्थापक
प्रा.अंतबोध बोरकर तसेच स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशाच प्रकारे राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक वाढेल, असा विश्वास रासेयो संचालक डॉ.श्याम खंडारे यांनी व्यक्त केला आहे.
































