10 आॅक्टोबरच्या महामोर्चासाठी ओबीसी समाजबांधव एकवटले

पुढील पिढीसाठी लढा- वडेट्टीवार

गडचिरोली : मराठा समाजाला कुणबी ठरवून ओबीसी प्रवर्गातून वाटा देण्याबाबत काढलेला जीआर ओबीसींच्या मुलभूत हक्कांवर, अधिकारांवर गदा आणणाला असल्याने तो जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या 10 आॅक्टोबरला नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा काढला जाणार आहे. त्याच्या तयारीसाठी गुरूवारी (दि.25) येथील कात्रटवार कॅाम्प्लेक्समधील सभागृहात ओबीसी समाजबांधवांची सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना मांडत एकजुटीने या महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, पहिल्या जीआरमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा उल्लेख होता, पण नंतरच्या जीआरमध्ये पात्र हा शब्द वगळण्यात आला. मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यासाठीच हा जीआर आहे. सर्व समाजाला मूर्ख बनवण्याचे काम सरकार करत आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत प्रवेश दिल्यास ‘बळी तो कान पिळी’ याप्रमाणे मराठा समाजातील लोक ओबीसींचा वाटा लाटतील. आज मराठा समाजाचे 168 आमदार आहेत. हा समाज प्रस्थापित आहे. त्याउलट ओबीसी लोक 18 पगड जातीत विखुरल्या गेलेले, विस्थापित आहेत. सध्या मिळत असलेले आरक्षण ओबीसींनाच कमी पडत आहे, त्यात मराठ्यांना वाटा देऊन ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय केला जात आहे. त्यामुळे आज लढलो नाही तर हा समाज बर्बाद होईल. ही राजकीय फायद्याची चळवळ नाही. केवळ समाजासाठी वाटत असलेल्या तळमळीतून मी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने यासाठी रस्त्यावर उतरून मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा जीआर रद्द करण्यासाठी 10 आॅक्टोबरला नागपूरच्या यशवंत स्टेडिअम ते संविधान चौकापर्यंतच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी आ.रामदास मसराम म्हणाले, केवळ पक्ष-पक्ष धरून बसून नका. कोणी कोणत्याही पक्षाचे असले तरी 55 ते 60 टक्के असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होत असताना सर्वांनी या लढ्यात उतरले पाहिजे. या लढ्याचे नेतृत्व करत असलेल्या विजयभाऊंच्या मागे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सभेला मंचावर आ.रामदास मसराम, गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अंजली साळवे, युवा नेते उमेश कोराम, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, परसराम टिकले आदी मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे संचालन काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सतीश विधाते यांनी केले.