जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

सरदार पटेल व इंदिराजींना अभिवादन

गडचिरोली : देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. तसेच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी, तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या विघटनकारी शक्तींचे आव्हान परतवून लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची शपथ सर्वांनी घेतली. सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कृतीमुळे देशाचे झालेले ऐक्य, अखंडत्व आणि सुरक्षा कायम राखण्याची प्रतिज्ञा यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर जिल्हाधिकारी संजय आस्वले, सर्व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.