गडचिरोली : जिल्ह्यात 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत नवीन विक्रम घडवा आणि मतदानाच्या बाबतीत देशभरात गडचिरोली जिल्ह्याचा आदर्श निर्माण करा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले. मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाची सुरूवात शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आली. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाची सामूहिक शपथ देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघातून 72 टक्के मतदान नोंदविल्या गेले आणि निवडणुका देखील शांततेत पार पडल्या. याबाबत भारत निवडणूक आयोगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे कौतुक केले असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी सांगितले. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मतदान करण्याविषयी प्रवृत्त करावे आणि किमान 75 ते 80 टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते आकाशात मतदान जनजागृती फलकाचे फुगे सोडण्यात आले. तसेच मतदार जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरमोरी मतदार संघात 9, 10 आणि 11 नोव्हेंबरदरम्यान गृहमतदान पार पडणार आहे.