अहेरीत नोंदणी केलेल्या वृद्ध व दिव्यांग मतदारांचे 100 टक्के गृहमतदान

लोकशाहीच्या उत्सवाला उत्साहात सुरूवात

गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 85 वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानाने जिल्ह्यात लोकशाहीच्या उत्सवाला सुरूवात झाली. अहेरी मतदार संघात गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या सर्व 38 मतदारांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला.

अहेरी विधानसभा मतदारसंघातील सिरोंचा येथील किष्टय्या कोम्ममेरा, वर्धना मोदूत, चंद्रय्या बोंताला, अहेरीतील जैयबुनिशा शेख, मुनिर मो.शेख, जोसेफ मिझ, यशोदाबाई रापर्तीवार, एटापल्लीतून अंजानाबाई मोहुर्ले आणि नागोराव बेनगुरे, अहेरीच्या गुणप्रिया पाटील, अमर कामिलवार, मुलचेरा तालुक्यातील 98 वर्षीय जगदीश फनीभूषण मित्र, 88 वर्षाच्या महिला मतदार बसंती विश्वास, 35 वर्षे वयाचा दिव्यांग मतदार सुमंत सुशील मंडल यांच्यासह एकूण 38 मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या मुलचेरा तालुक्यातील मतदारांचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे व मतदान अधिकाऱ्यांच्या चमुने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीचे, मतदानाचे महत्व आणि इतरांना मतदान करण्यास प्रोत्साहन करण्याबाबत संवाद साधण्यात आला.

आरमोरी विधानसभा मतदारसंघात 10 सप्टेंबरपासून आणि गडचिरोली मतदार संघात 11 सप्टेंबरपासून गृहमतदानाला सुरवात होत आहे.