गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील काही गावांमध्ये अद्याप कोणतेच उमेदवार पोहोचलेले नसले तरी काही जागरूक मतदार असलेल्या 85 वर्षांवरील 127 आजी-आजोबा आणि 38 दिव्यांगांनी मतदानाचा हक्कही बजावला आहे. त्यांच्यासाठी खास मतपत्रिकेची सोय प्रशासनाच्या वतीने करून देण्यात आली आहे. दरम्यान मतदान प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदान करावे आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवून गडचिरोलीच्या नावे देशात नवा विक्रम घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदारांना केले आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात 80 पेक्षा जास्त वय असणारे 1037 मतदार, दिव्यांग 338, आणि अत्यावश्यक सेवेत असणारे 28 मतदार आहेत. त्यांना पोस्टल बॅलेटवर मतदान करण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनीही व्हिडीओ संदेशातून मतदारांना बिनधास्तपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. सीईओ सिंह यांनी मराठीसोबत गोंडी भाषेतही मतदारांना आवाहन केले आहे.
उमेदवारांसमक्ष मॉक-पोल प्रात्यक्षिक, सिलिंगच्या वेळापत्रकात बदल
लोकसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदान यंत्रावर अभिरूप मतदान (मॉक पोल) करून इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचे सिलिंग (Candidate setting) करण्याच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
आमगाव, आरमोरी व गडचिरोली विधाननसभा मतदार संघाकरिता सुधारित वेळापत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार आमगाव विधानसभा मतदारसंघाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे 10 व 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता, आरमोरी विधानसभा मतदारसंघाकरिता तहसील कार्यालय देसाईगंज येथे 11 ते 13 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, गडचिरोली मतदारसंघाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे 11 व 12 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता, अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली येथे 11 व 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता, ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघाकरिता शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता आणि चिमुर विधानसभा मतदारसंघाकरिता राजीव गांधी सभागृह, तहसील कार्यालय परिसर चिमूर येथे दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरक्षा कक्ष उघडण्यात येवून मतदार यंत्र सिलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक लढणारे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी केली आहे.