अहेरी : गावातील गुरे चरायला जंगलात गेलेल्या 76 वर्षीय वृद्धावर अचानक वाघाने हल्ला केला. पण त्याला आपल्याजवळील काठीने प्रतिउत्तर देत गुराख्याने वाघाचा हल्ला परतवून लावला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या झुंजीत वाघाने चक्क पळ काढला. मात्र वाघाच्या नखांमुळे वृद्ध गुराखी गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुराखी आणि वाघांमध्ये झालेला हा थरार अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीटमध्ये काल, दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडला. शिवराम गोसाई बामनकर असे गंभीर जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
शिवराम बामनकर हे सकाळच्या सुमारास खांदला गावातील जनावरे चराईसाठी घेऊन गेले होते. राजाराम उपक्षेत्रातील चिरेपल्ली बीटात जनावरे चराई करीत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने शिवराम यांच्यावर झडप घातली. पण शिवराम यांनी सावध पवित्रा घेऊन वाघाचा मोठ्या हिमतीने सामना केला. दोघांमध्ये काही वेळ झुंजही झाली. पण गुराखी शिवराम हे वाघावर भारी पडल्याने वाघाने जंगलात पळ काढला.
गुराखी शिवराम यांच्या शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्यांनी कसेबसे गाव गाठत या थराराची आपबीती कुटुंबीयांना सांगितली. लगेच त्यांना राजाराम येथील आरोग्य केंद्रात आणि नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविले.
मोठ्या हिमतीने वाघाचा प्रतिकार करून त्याला पळवून लावल्याने हा पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला आहे. मात्र वाघाच्या अस्तित्वामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडून तात्काळ मदतीची मागणी
शिवराम गोसावी बामनकर हे जनावरे चराईसाठी जंगल परिसरात गेले असताना वाघाने हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे वनविभागाने जखमी शिवराम बामणकर यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी मुलगी वनिता गजानन बामनकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापूर यांच्याकडे केली आहे.
































