एकाच दिवशी एकाच गावात वृद्धेसह तरुणाचा अकाली मृत्यू

गळफास आणि विष घेतल्याचा संशय

एटापल्ली : तालुक्यातील बुर्गी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या येमली गावात एकाच दिवशी दोघांचा अकाली मृत्यू झाला. त्यात एका तरुणासह एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. वृद्ध महिलेने गळफास घेऊन तर तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पहिल्या घटनेत येमली येथील मुकेश रामदास मडावी (27 वर्ष) या तरुणाचा अकाली मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, दि.17 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास मुकेश हा घरातील बाथरूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ बाहेर आला नाही. कुटुंबीयांना संशय आल्यानंतर त्याची आई बाथरूमकडे पहायला गेली असता तो मृतावस्थेत आढळून आला. त्याने विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमागील नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. तरुणाच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दुसऱ्या घटनेत याच गावात पिल्ली मुरा गोटा (70 वर्ष) या वृद्ध महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. वृद्धावस्थेतील एकाकीपणा, आजारपण किंवा डतर वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकाच गावात आणि एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे येमली गाव हादरून गेले आहे. या दोन्हीं प्रकरणांचा पुढील तपास बुर्गी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहे. शवविच्च्छेदन अहवालानंतर मृत्यूची नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत. पोलीस सर्व बाजुंनी तपास करीत आहेत.