एकाच कमांडोच्या निशाण्यावर ‘अबतक 101’ नक्षल बळी

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गौरव

पीएसआय मडावी यांना केक भरविताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सोबत इतर अधिकारीगण

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात तब्बल 26 वर्षांपासून सेवारत असलेले सी-60 पथकाचे पार्टी कमांडर वासुदेव मडावी यांच्या नावावर 101 माओवाद्यांना कंठस्नान घालण्याच्या विक्रमी कामगिरीची नोंद झाली आहे. या यशस्वी कामगिरीसाठी त्यांचा गुरूवारी पोलीस अधीक्षकांनी गौरव केला.

तीन वेळा वेगवर्धित पदोन्नती मिळून पोलीस उपनिरीक्षक झालेले वासुदेव मडावी यांनी आतापर्यंत 58 चकमकींमध्ये सहभाग घेतला. आतापर्यंत त्यांच्या नावावर 97 बळी होते. कोपर्शीच्या चकमकीतही त्यांनी सहभागी होऊन 4 जणांना यमसदनी पाठविल्याने त्यांच्या नावावर एकूण 101 माओवाद्यांचा वेध घेतल्याची नोंद झाली आहे.

पीएसआय मडावी यांना त्यांच्या कामगिरीसाठी आतापर्यंत राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक, असाधारण कुशलता पदक, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहेत.

वासुदेव मडावी हे 1998 मध्ये गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर रुजू झाले होते. त्यांनी माओवाद्यांविरुद्ध लढणा­ऱ्या विशेष अभियान पथकामध्ये 26 वर्षांहून अधिक काळ कर्तव्य बजावले आहे. पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात 3 वेगवर्धीत पदोन्नती मिळाल्या आहेत. त्यांनी 5 जहाल माओवाद्यांनाही अटक केली आहे. त्यांच्या अभियानातील कौशल्य आणि निर्भय दृष्टिकोनामुळे त्यांना सी-60 पथकामध्ये एक महत्वपूर्ण पार्टीं कमांडर म्हणून जबाबदारी देण्यात आली. वयाच्या 48 व्या वर्षीही ते ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत.

सर्वात धोकादायक परिस्थितीतही नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदार तसेच वरिष्ठांकडून देखील सन्मान मिळत आहे. त्यांना आणखी दोन पोलीस शौर्य पदकासाठीचे प्रस्ताव सध्या विचाराधीन आहेत.

कोपर्शीच्या कामगिरीवरून परतल्यानंतर त्यांचा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केक भरवून सन्मान केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, अपर पोलीस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.