कुरखेडा : कुरखेडा- सोनसरी- उराडी मार्गावरील वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याचा कडेला असलेल्या दगड व झाडावर धडकली. या अपघातात दूचाकीचालक रतिराम हलामी (50 वर्ष) रा.येंगलखेडा हे ठार झाले. ते येंगलखेडा येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे संचालक होते. विशेष म्हणजे हलामी यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृ्त्यू झाला. (अधिक बातमी खाली वाचा)

रतीराम घनचू हलामी हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने (क्र.एम एच 33, ए जी 9686) रविवारी सकाळी कुलकुली, चवेला येथे गेले होते. काम आटोपत उराडी- सोनसरी मार्गे ते एकटेच येंगलखेडा येथे परत येत असताना वळणावर त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली. प्रथम रस्त्याच्या लगत असलेल्या दगडावर आणि नंतर एका झाडाला त्यांची धडक झाली. यावेळी ते रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेले. डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे त्यांचा डोक्याला गंभीर दूखापत झाली आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, नातू असा आप्तपरिवार आहे.
































