गडचिरोली : जिल्ह्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांची किंवा बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस शासनामार्फत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे होत्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सध्या कार्यरत असलेल्या 40 नोंदणीकृत सोनाग्राफी केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
माहिती देणाऱ्याचे नाव राहणार गुप्त
जिल्ह्यामध्ये जर कुठेही गर्भलिंग परीक्षण करून अवैध गर्भपात होत असेल किंवा सोनाग्राफी केंद्रात अपात्र व्यक्तींकडून तपासणी केली जात असेल, तर त्याची खात्री करून प्रशासनाला माहिती द्यावी. ही माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक, कर्मचारी किंवा अधिकारी यापैकी कोणीही असू शकते. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
येथे नोंदवा तक्रार
बेकायदेशीर प्रकारांची तक्रार खालील टोल-फ्री क्रमांक, वेबसाईट येथे नोंदवता येईल.
टोल-फ्री क्रमांक: 1800002334475 / 104
वेबसाईट : https://amchimulgimaha.in
थेट संपर्क : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली.
































