देसाईगंज : येथील व्यापारी परसवाणी कुटुंबियांच्या कारला ब्रह्मपुरी-नागभीर मार्गावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यात गंभीर जखमी असणाऱ्या जितेंद्र परसवाणी (45 वर्ष) यांना हा धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का बसून अखेर त्यांनीही मृत्यूला कवटाळले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.
दिलीप परसवाणी (55 वर्ष) आणि महेक जितेंद्र परसवाणी (42 वर्ष) या दिर-भावजयींचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. जखमींमध्ये जितेंद्र परसवाणी (45 वर्ष) आणि मुले गौरव व उदय यांचा समावेश होता. हे कुटुंब पुतणीच्या विवाहासाठी नागपूरला गेले होते. तेथून मध्यरात्री परत देसाईगंजला येण्यासाठी निघाले असताना पहाटे 5 वाजताच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली होती. जखमींवर ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.