गडचिरोली : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12-गडचिरोली-चिमुर या अनुसूचित जमातीसाठी राखीव लोकसभा मतदारसंघात मंगळवारी दोन उमेदवारांनी एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात भारतीय जनता पक्षातर्फे अशोक महादेवराव नेते यांनी दोन तर बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्षातर्फे बारीकराव धर्माजी मडावी यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. यापूर्वी दोन उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. त्यामुळे आतापर्यंत केवळ 4 जणांचे नामनिर्देशनपत्र आले आहेत. दरम्यान बुधवारी शेवटचा दिवस असल्याने काँग्रेससह आणि कोणत्या पक्षांचे उमेदवारी अर्ज येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत अनेक ईच्छुकांनी 86 नामनिर्देशन अर्जाची उचल केली आहे. बुधवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दि.28 रोजी सर्व अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. त्यात वैध ठरलेल्या अर्जधारकांची उमेदवारी ग्राह्य धरली जाईल. त्यांना 30 मार्च पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत मिळणार आहे. त्यामुळे 31 मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात होणार आहे.
अपक्ष उमेदवारांना 10 प्रस्तावक आवश्यक
उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना याच लोकसभा मतदार संघातील प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना एक मतदार प्रस्तावक, तर अपक्ष आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना 10 मतदार प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. याशिवाय अनामत रक्कम 12 हजार 500 रोखीने किंवा चलनाने भरावे लागतात. शपथपत्रातील सर्व रकाने स्पष्ट शब्दात पूर्णपणे भरणे, सक्षम प्राधिकाऱ्यासमोर शपथ घेतल्याबाबतचे शपथपत्र सादर करणे, आदी सूचनांसोबतच भारत निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाबाबत निर्गमित केलेल्या सविस्तर सूचनांचे अवलोकन उमेदवारांनी करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.