गडचिरोली : गडचिरोलीचे वादग्रस्त आणि हेकेखोरपणासाठी प्रसिद्ध झालेले तहसीलदार संतोष आष्टीकर यांची उशिरा का होईना, अखेर उचलबांगडी केल्यानंतर तहसील कार्यालयातील तमाम कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही समाधान व्यक्त केले होते. पण आता तहसीलदार म्हणून ज्यांच्याकडे प्रभार दिला ते सचिन जयस्वाल यांची जुनी कारकिर्दही वादग्रस्त असल्याने त्यांच्या नियुक्तीला डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.
जयस्वाल हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात आस्थापना विभागाचे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आता तात्पुरता गडचिरोलीच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे कार्यरत असताना तेथील रेती तस्करांकडून 35 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले होते. त्यामुळे गडचिरोली तहसीलदारपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यास शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाने आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे. या पक्षांचे नेते रामदास जराते, अमोल मारकवार आणि राज बन्सोड यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले.
गडचिरोलीचे वादग्रस्त तहसीलदार संतोष आष्टीकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (संजय गांधी योजना) या रिक्त पदावर स्थानांतरित केले. त्यानंतर तहसीलदार (आस्थापना) जयस्वाल यांच्याकडे प्रभार देण्याचे आदेश काढण्यात आले. वास्तविक जयस्वाल हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे कार्यरत असताना दि.12 एप्रिल 2024 रोजी 35 हजारांची लाच घेताना पकडल्या गेले होते. यावेळी त्यांच्या निवासस्थानी 37 लाख 52 हजार रुपये आणि परभणी येथील राहत्या घरी 9 लाख 40 हजार रुपये अशी एकूण 46 लाख 92 हजार रुपयांची रोख बेहिशेबी रक्कम आढळून आली होती. त्यानंतर शासनाने त्यांना शिक्षा म्हणून गडचिरोली येथे नियुक्ती दिली होती. असे असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोलीच्या तहसीलदारपदाचा प्रभार जयस्वाल यांच्याकडे सोपविणे योग्य नसून येथील रेती तस्करीला पुन्हा वाव देण्यासारखे असल्याची टीका डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्री असलेल्या या जिल्ह्यात आता भ्रष्ट आणि शिक्षेवर आलेले अधिकारी कारभार सांभाळणार असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रामदास जराते, अमोल मारकवार व राज बन्सोड यांनी दिला आहे.