गडचिरोली : नवरात्रौत्सव आता अंतिम टप्प्यात असून काही मंडळांकडून विविध उपक्रम राबवविले जात आहेत. यात आज कारगिल चौकात अस्थिरोग तपासणी तर उद्या कात्रटवार कॅाम्प्लेक्समध्ये चित्रकला स्पर्धा होणार आहे.
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, सिंधु आयपिडीक हॉस्पिटल गडचिरोली व माहात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य अभियान गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.1 ऑक्टोबर) कारगील चौक गडचिरोली येथे सायंकाळी 4 ते 6 दरम्यान निःशुल्क अस्थिरोग तपासणी शिबीर आयोजीत केले आहे.
या शिबीरात निःशुल्क अस्थिरोग तपासणी. निवडक आजारांवरील निःशुल्क औषध वाटप, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी व पात्र लाभार्थ्यांची निःशुल्क शस्त्रक्रियेसाठी निवड होणार आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
2 ऑक्टोबरला उमंग चित्रकला स्पर्धा
गडचिरोली शहर व परिसरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘उमंग चित्रकला स्पर्धा –2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त उमंग आर्ट कल्चरल अॅन्ड फिजिकल अकॅडमी आणि नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत कात्रटवार कॉम्प्लेक्स, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे ही स्पर्धा होणार आहे.
चार गटांमध्ये होणार स्पर्धा
स्पर्धेत विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
गट अ : वर्ग पहिली ते दुसरी, गट ब : तिसरी ते चौथी, गट क : पाचवी ते सातवी आणि गट ड : आठवी ते दहावी व खुला गट
कोणत्याही गटासाठी रंगसाहित्याच्या माध्यमाचे बंधन ठेवलेले नाही. सहभागी विद्यार्थ्यांनी रंगसाहित्य स्वतः आणायचे असून चित्र काढण्यासाठी लागणारा कागद आयोजक संस्थेतर्फे पुरविण्यात येईल.
निकाल व बक्षीस वितरण
स्पर्धेचा निकाल तत्काळ जाहीर करण्यात येणार असून विजेत्या विद्यार्थ्यांचा पुढील टप्प्यात विभागीय व केंद्रस्तरीय बक्षीस वितरण सोहळ्यात सत्कार करण्यात येईल. यासोबतच निवडक कलाकृतींचे प्रदर्शन गडचिरोली येथे भरविले जाणार आहे.
प्रवेश फी नाही
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा शाळांना प्रवेश फी आकारली जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरातील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी समान संधी उपलब्ध होणार आहे.
आयोजकांचे आवाहन
‘उमंग चित्रकला स्पर्धा’ या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून दरवर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षीही गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उमंग आर्ट कल्चरल अॅन्ड फिजिकल अकॅडमी व नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.