गडचिरोली : जूनमध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने धानाचे पऱ्हे (रोप) लावणीसाठी जवळपास 15 दिवस उशिर झाला. पाऊस येईल या आशेने ज्यांनी पऱ्हे टाकले त्यांचे पऱ्हे मरनासन्न अवस्थेत आले होते, पण चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने त्या पऱ्ह्यांना जीवनदान मिळण्यासोबच शेतकऱ्यांना जीव भांड्यात पडला आहे. पावसाने अशीच साथ दिल्यास धान रोवणीच्या कामांना वेग येणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

डीएपी खताऐवजी पर्यायी खतांचा वापर करा
खरीप हंगामामध्ये डीएपी खताच्या वाढत्या मागणीमुळे त्याचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
राज्य शासनाकडून मृद परीक्षण व जमिनीच्या आरोग्य पत्रिकांवर आधारित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबविली जात आहे. जिल्ह्यात काही भागांत पेरण्या सुरु झाल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे डीएपी खताची मागणी लक्षणीय वाढली आहे. डीएपी खतामध्ये 18 टक्के नत्र (N) आणि 46 टक्के स्फुरद (P) असते.
डीएपी खताच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पर्यायी खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. यामध्ये एसएसपी हे सर्वात प्रभावी पर्यायी खत असून त्यामध्ये 16 टक्के स्फुरदसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. तेलबिया पिकांसाठी एसएसपी फायदेशीर ठरते. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी वापरल्यास डीएपीचा उत्तम पर्याय तयार होतो.
तसेच खालील संयुक्त खतांचा वापर देखील उपयुक्त ठरतो, त्यात : NPK 10:26:26, NPK 20:20:0:13, NPK 12:32:16, NPK 15:15:15, हे खत नत्र, स्फुरद व पालाश यांसारखी आवश्यक अन्नद्रव्ये एकत्रितपणे देतात, जे पिकाच्या संतुलित वाढीसाठी आवश्यक आहेत. याशिवाय, TSP (Tripple Super Phosphate) मध्ये 46 % स्फुरद असते. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी TSP वापरल्यास हे देखील प्रभावी पर्याय ठरू शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त डिएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा विचारपूर्वक वापर करावा आणि पिकाचे पोषण संतुलित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.