धान उत्पादकांच्या बँक खात्यात पोहोचला 104 कोटींचा बोनस

48 हजार शेतकऱ्यांना दिलासा

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देत 104 कोटी रुपयांचा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला आहे. या बोनसच्या माध्यमातून 48 हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ देण्यात येणार आहे.

बोनस वितरणासाठी शासनाकडून 120 कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यापैकी 104 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. शिल्लक रक्कम सोमवारी बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील वाटपाला गती मिळणार आहे.

शासनाने हेक्टरी 20 हजार रुपये या दराने, जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील खर्चासाठी आर्थिक आधार मिळत आहे. बोनस वाटपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, उर्वरित रक्कमही लवकरच उपलब्ध होऊन सर्व लाभार्थ्यांना बोनस दिला जाईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.