बांबूची लागवड हाच उपाय; अनुदानाचा लाभ घ्या- पटेल

बांबू प्रकल्पासह देसाईगंजला भेट

गडचिरोली : दिवसेंदिवस वाढणारे तापमान, कमी होणारी जंगले आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. वाढलेल्या तापमानाचा फळबागा आणि शेतीतल्या इतर पिकांवरही नकारात्मक परिणाम होत आहे, त्यामुळे उत्पादनात घट दिसून येत आहे. यावर एक प्रभावी आणि शाश्वत उपाय म्हणून बांबू लागवडीकडे पाहिले जात आहे. सरकारी अनुदानातून या बांबू लागवड करून योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना केले.

पटेल यांनी येथील आदिवासी बांबू प्रक्रिया प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार डॅा.अशोक नेते, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रिती हिरळकर, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ताकसांडे आदी उपस्थित होते.

तसेच देसाईगंज येथे आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतही पाशा पटेल यांनी चर्चा केली. यावेळी तहसीलदार प्रिती डुडुलकर, सहाय्यक उपवनसंरक्षक अरुण सुर्यवंशी तसेच महसूल, वन, कृषी व औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

वाढत्या तापमानाला आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी बांबूची लागवड हा एक चांगला उपाय आहे. बांबू पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो. सोबतच, बांबूची लागवड अनेक अर्थांनी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. इतर फळझाडे आणि पिकांना वन्य प्राण्यांचा जास्त धोका असतो, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. मात्र बांबू लागवडीमुळे हा धोका कमी होतो, असे पाशा पटेल यांनी सांगितले.

बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार रोजगार हमी योजनेअंतर्गत विशेष अनुदान देत आहे. बांबूला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. याचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये होतो, त्यामुळे बांबूची शेती शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकते.

देसाईगंजमध्ये केले स्वागत व सत्कार

पाशा पटेल यांचे देसाईगंजमध्ये आगमन झाल्यानंतर विश्रामगृहावर माजी आ.कृष्णा गजबे यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छदेऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी ब्रह्मपुरीचे माजी आ.अतुल देशकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, उद्योजक तथा भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, उद्योजक दिनेश शर्मा यांच्यासह इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.