आरोग्य सेविकेला हेलिकॅाप्टरने पोहोचवून दिले उपचार

आरेवाडा प्रा.आ.केंद्रात कार्यरत

भामरागड : जिल्हाभरात चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागडसह एकूण 112 गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे. अशातच भामरागड तालुक्यातील आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका सीमा बांबोळे यांची आजारपणामुळे प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे योग्य उपचारासाठी त्यांना गडचिरोलीत आणणे गरजेचे होते. त्यासाठी पोलीस विभागाने आपले हेलिकॅाप्टर उपलब्ध करून दिले. त्यामुळे बांबोळे यांना वेळीच उपचार मिळून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

आरोग्य सेविका सीमा बांबोळे काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारासाठी तातडीने गडचिरोलीला हलवण्याची आवश्यकता होती. पण पुरामुळे मार्ग बंद असल्याने ते शक्य होत नव्हते. याबाबतची माहिती जि.प.च्या आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांना दिली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हेलिकॅाप्टर उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यानुसार पोलिसांकडील पवनहंस कंपनीचे हेलिकॉप्टर तातडीने भामरागडसाठी रवाना करण्यात आले. पोलीस स्टेशनमधील हेलिपॅडवरून सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे.

ही कार्यवाही गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड, पोस्टे भामरागड येथील अधिकारी व कर्मचारी, भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी, आणि पवनहंसच्या पायलट्सनी यशस्वीपणे केली.