पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी, सिरोंचा तालुक्याला लाभ

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रयत्न

अहेरी : बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना प्रत्यक्षात यश आले आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातून गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती यासारख्या बारमाही नद्या वाहतात. मात्र या भागात एकही सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व रेगुंठा सारख्या भागात उपसा सिंचन योजना आणण्यासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मागील अनेक वर्षापासून प्रयत्न केले. अखेर बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या या उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती स्वतः मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.

या उपसा सिंचन योजनेमुळे सिरोंचा तालुक्यातील बऱ्याच गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल आणि विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होईल. परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा परिसरातील अनेक गावे सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूजल पातळीत होणार वाढ

मागील अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजनेसाठी मी प्रयत्न करत होतो. बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पाणी उपसून ते सिंचनासाठी वापरले जाणार आहे. योजनेमुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल आणि विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होईल. एवढेच नाही तर या भागात रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी प्रतिक्रिया मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.