हजारो आरमोरीकर उतरले रस्त्यावर, युवतीला मारहाण प्रकरणाचा निषेध

दुकानांसह शाळा-कॅालेजही ठेवले बंद

आरमोरी : येथील शिवम रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या युवतीला मोबाईल चार्जर दिले नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे मारहाण करण्याच्या प्रकरणाचा चांगलाच भडका उडाला. मंगळवारी आरमोरीकरांनी कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध केला. याशिवाय निषेध मोर्चात हजारो लोकांनी सहभागी होऊन आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी केली. आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पोलीस स्टेशनवर गेल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या नावे निवेदन देण्यात आले.

अशा घटनांची पुनरापृत्ती होऊ नये आणि पोलीस विभागाने असे प्रकरण कडकपणे हाताळावे अशी आरमोरीकरांची मागणी आहे. त्यामुळे आरमोरी बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन दुकाने, शाळा-कॅालेजही बंद ठेवले होते. भाजपसह काँग्रेस आणि इतरही पक्षांचे तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.