गडचिरोली : वर्षभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना वादग्रस्त ठरलेले आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांच्यावर स्थानिक नागरिकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गडचिरोलीतील गाई वाटप घोटळ्यात गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलेले गुप्ता सध्या सांगली, मिरज महापालिकेत आयुक्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असताना त्यांनी केलेल्या प्रतापांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे आणि विविध क्षेत्रातील पीडित नागरिकांनी माध्यमांसमोर वाचा फोडली. त्यामुळे त्या आरोपांची शासकीय यंत्रणा चौकशी करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मानवाधिकार संघटनेने राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदिवासी जमाती आयुक्तालयाकडे केलेल्या तक्रारीत गुप्ता यांना सेवेतून निलंबित करण्यासह त्यांच्यावर आदिवासी नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी अॅट्रॅासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बनावट नोटीस पाठवून कंत्राटदारांकडून खंडणी वसूल करणे, विरोधात आवाज उठविणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरूंगात डांबणे किंवा त्यांना उद्ध्वस्त करणे असे प्रकार केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. संबंधित पीडित नागरिकांनी यावेळी आपबिती सांगितली. नक्षलग्रस्त, मागास आणि आदिवासीबहुल जिल्ह्यातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन शेकडो कोटी रुपये खर्च करीत आहे. पण काही असंवेदनशिल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या प्रयत्नांना हरताळ फासल्या जात आहे.
भामरागड हा राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका आहे. असे असताना भामरागडच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी असताना (2021 ते 2023) शुभम गु्प्ता यांनी गाई वाटप योजनेत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका आहे. अपर आयुक्तांनी याची चौकशी केल्यानंतर गुप्ता दोषी आढळले. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजातील लाभार्थी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे धमकावणे, उपविभागीय अधिकारी या नात्याने कंत्राटदारांना धमकावणे आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेणे असे प्रकार घडल्याचा आरोप आहे. ग्रामसभांमध्ये जनजागृती करणाऱ्या भामरागडच्या भारती इष्टाम यांनी गुप्ता यांनी आपला कसा छळ केला आणि त्याचा आपल्या कुटुंबावर कसा परिणाम झाला हे पत्रपरिषदेत सांगितले. आदिवासींचे कल्याण करण्यासाठी येणारे अधिकारी आदिवासींचेच शोषण करत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा, असा सवाल यावेळी करण्यात आला. यावेळी यशोदा पुंघाटे, विनोद चव्हाण, मनोहर बोरकर, जावेद अली, राहुल झोडे यांनीही आपल्याशी घडलेला प्रकार सांगितला.
गुप्त यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्यासह त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची निवृत्त न्यायाधिशांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी प्रणय खुणे यांनी केली.