गडचिरोली : दिवाळी म्हटले की फटाके आणि फराळ आलाच. फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केल्याचा फिलच येत नाही. मात्र आता गडचिरोलीकरांची फटाक्यांच्या बाबतीतली पसंत हळूहळू बदलत आहे. त्यांना मोठा आवाज करणाऱ्या बॅाम्बऐवजी आकाशात जाऊन फुटणाऱ्या आणि विविध डिझाईनमध्ये आकर्षण चमचमते तुषार काढणाऱ्या फटाक्यांचे आकर्षण वाढले आहे. आज लक्ष्मीपुजनानिमित्त रात्री
गडचिरोलीचे आकाश विविध ढंगाच्या या फटाक्यांनी व्यापले जाणार आहे. यामुळे वायुप्रदुषणात घट होणार नसली तरी ध्वनीप्रदुषण काही प्रमाणात कमी होणार आहे. गडचिरोली शहरात धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर अस्थायी फटाका मार्केट सजले आहे. तमाम गडचिरोलीकरांची पावलं
गेल्या पाच-सहा दिवसांपासून या फटाका मार्केटेकडे वळत आहेत. याशिवाय शहराच्या विविध भागातही काही विक्रेत्यांनी फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. मुलांमध्ये पॅापअप, रस्सी फटाका, माचिस फटाका,चुटपूट यासह टिकल्या फोडण्याच्या बंदुकांचे आकर्षण आहे. देवी-देवतांचे फोटो असलेले
बॅाम्ब मार्केंटमधून हद्दपार झाले आहेत. त्याऐवजी सुतळी बॅाम्बला जास्त पसंती देत आहेत. याशिवाय अनार, फुलझड्या, चक्र या नेहमीच्या फटाक्यांचीही विक्री जोरात झाली आहे. गेल्या चार दिवसात गडचिरोलीकरांनी अंदाजे दिड कोटी रुपयांच्या फटाक्यांची खरेदी केली आहे. आकाशात जाऊन फुटणाऱ्या आणि आकर्षक स्टार्स काढणाऱ्या फटाक्यांची किंमत 100 रुपयांपासून 4 हजारापर्यंत असल्याचे विक्रेते सुनील चडगुलवार यांनी सांगितले.