गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज, 22 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावर्षीचा त्यांचा हा तिसरा गडचिरोली दौरा असेल. विशेष म्हणजे 2014 ते 2019 या काळात आणि आताच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मिळून जवळपास 9 ते 10 वेळा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या जिल्ह्यात सर्वाधिक वेळा येणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक रेकॅार्ड आपल्या नावावर केला आहे. आजच्या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी 2 वाजता आयोजित या कार्यक्रमाला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, खासदार डॉ.नामदेव किरसान, आ.सुधाकर अडबाले, आ.डॉ.अभिजीत वंजारी, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.मिलींद नरोटे, आ.रामदास मसराम, तसेच अपर मुख्य सचिव (वने) तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलींद म्हैसकर उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांनी कळविले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची कार्यक्रमस्थळी भेट देऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या बैठकीच्या, मांडव व व्यासपीठाच्या व्यवस्थेची पाहणी करून कार्यक्रमाची सुसूत्रता आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या पाहणीवेळी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, अपर पोलीस अधीक्षक गोकुळ, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) स्मिता बेलपत्रे, एनआयसीचे संजय त्रिपाठी तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
“हरित महाराष्ट्र” मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात तब्बल 40 लाख झाडे लावण्यात येणार असून, हे अभियान जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारे ठरणार आहे.
21 ते 23 जुलैदरम्यान ड्रोन आणि उड्डाणबंदी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर, हॉट एअर बलून, रिमोट कंट्रोल उड्डाण साधने इत्यादींचा वापर होऊ नये म्हणून गडचिरोली व मौजा कोनसरी येथील कार्यक्रम स्थळाभोवतालचा 5 किमी परिसर, तसेच संपूर्ण गडचिरोली शहर आणि जिल्हा ‘उड्डाणबंदी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार, 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 23 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत वरील प्रकारच्या उड्डाण साधनांचा वापर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला आहे. “ड्रोन नियम 2021” अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आलेला असून, त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.
































