जिल्हाभर पोळ्याचा उत्साह, विसोरात ट्रॅक्टरची मिरवणूक

बैलांच्या संख्येत दरवर्षी घट

गडचिरोली : शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलपोळ्यानिमित्त शुक्रवारी जिल्हाभर ग्रामीण भागात उत्साह दिसून आला. महिलांनी बैलांची पुजा करत नैवेद्य खाऊ घातले. मात्र देसाईगंज तालुक्यात बैलांऐवजी ट्रॅक्टर्सना सजवून पुजा करत त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

बैलांना पोसणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाल्याने दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत आहे. ठिकठिकाणच्या पोळ्यातही याचा परिणाम दिसून आला. शहरी भागात तर पुजेसाठीही महिलांना बैलजोडी येण्याची वाट पाहावी लागली. दुसरीकडे शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे मशागतीची सर्व कामे ट्रॅक्टरमार्फत केली जात आहे. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने ट्रॅक्टरच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. देसाईगंज तालुक्यातील विसोरा हे गाव ट्रॅक्टरचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

विसोरा गावात 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे पोळ्याच्या निमित्ताने या गावात बैलांऐवजी ट्रॅक्टरचाच पोळा भरविला जातो. ट्रॅक्टरला सजवून पुजा केल्यानंतर गावातून एकामागे एक ट्रॅक्टर लावत मिरवणूक काढली जाते. यावर्षीही त्याच पद्धतीने पोळा साजरा करण्यात आला.