गडचिरोली : अहेरीच्या प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने मित्राच्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातल्या रंगधामपेठा या गावात एका अल्पवयीन मुलीने झाडावर गळफास घेऊन जीवन संपविले.
प्राप्त माहितीनुसार, मूळचे अमरावती येथील असलेले पोलीस शिपाई अविनाश नाईकवाडे (38 वर्ष) हे सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. दरम्यान कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांना अहेरीच्या प्राणहिता पोलीस उपमु्ख्यालयात नियुक्ती देण्यात आली होती. त्यांच्या मित्राच्या खोलीवर राहात होते. दरम्यान मित्र खोलीच्या गॅलरीत मोबाईलमध्ये व्यस्त असताना अविनाश यांनी पंख्यावर गळफास लावून घेतला. त्यांना नेमका कोणता मानसिक ताण होता हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दुसऱ्या घटनेत आसरअली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंगधामपेठा या गावात साक्षी व्यंकटराव कालवा (15 वर्ष) या अल्पवयीन मुलीने घराबाहेर असलेल्या झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. रात्री 10 वाजतानंतर घरातील सर्व लोक झोपी गेले असताना तिने हे कृत्य केले. तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. आसरअली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.