वर्षभरातील कामगिरीसाठी गडचिरोलीतील १३० पोलिस अधिकारी-अंमलदारांना सन्मानचिन्ह

महाराष्ट्र दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात 2023 या वर्षात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गडचिरोली पोलिस दलातील 130 अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. गडचिरोलीत महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात त्यांतील काहींना जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात सन्मानित करण्यात आले. तसेच उर्वरित जणांना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

पोलिस अधीक्षक कार्यालयात सकाळी 6.45 वाजतापोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्वप्रथम शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन सर्व शहिद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर 1 मे 2019 रोजी जांभुळखेडा ते कुरखेडा मार्गावर नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. याशिवाय 2023 या वर्षात उल्लेखनिय कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झालेल्या अधिकारी-अंमलदारांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

यावेळी उपस्थित शहीद कुटुंबियांशी संवाद साधून अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी (धानोरा) सुहास शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी (गडचिरोली) सुरज जगताप उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी जनसंपर्क कार्यालयाचे प्रभारी अधिकारी व अंमलदारांनी सहकार्य केले.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा पहा खाली)