गडचिरोली : संयुक्त राष्ट्रसंघाने 2018 पासून 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. या दिवसाचे औचित्य साधून गडचिरोलीत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागासह सायकलस्वारांची रॅली काढण्यात आली. (सविस्तर बातमी खाली वाचा)

सायकल ही साधी, परवडणारी, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल असे शाश्वत वाहतुकीचे साधन आहे. सायकल चालविणे शरीर स्वास्थासाठी फायदेशिर आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी व अधिकाधिक लोकांनी सायकलीचा वापर करावा यासाठी हा जागतिक सायकल दिन साजरा केला जातो.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सकाळी 7 वाजता पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौकापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन/अभियान) एम.रमेश तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्याशिवाय पोलीस अधिकारी, अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक/युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या सायकल रॅलीचा शहिद पांडू आलाम सभागृहात समारोप करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सर्व सहभागी सायकलस्वारांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पो.अधीक्षक निलोत्पल म्हणाले, सायकल चालविल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात संरक्षण होते. आठवड्यातून किमान दोन दिवस जरी एक तास सायकल चालवली तरी आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. कार्यक्रम संपल्यावर सर्व सहभागींना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.