बदली झालेल्या 47 पोलीस अधिकाऱ्यांना वार्षिक सोहळ्यात सन्मानपूर्वक निरोप

पेंढरी एसडीपीओ, मुलचेरा पो.स्टे.प्रथम

गडचिरोली : जिल्ह्रात आव्हानात्मक व खडतर सेवा पूर्ण केलेल्या 47 पोलीस अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यांमध्ये बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ, आणि पोलीस दादालोरा खिडकीअंतर्गत शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्या­त मोलाची भूमिका बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करण्यासाठी ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफीसर ऑफ द इयर’ हा वार्षिक सन्मान सोहळा शनिवारी (दि.13) पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य हॉलमध्ये पार पडला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला “कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफीसर ऑफ द मंथ” हा उपक्रम राबविण्यात येतो. याच माध्यमातून जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत पोस्टे/ उपपोस्टे/ पोमकें स्तरावर अधिकारी/ अंमलदार यांनी वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मुल्यमापन करुन वार्षिक सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यात एसडीपीओ कार्यालय पेंढरी आणि मुलचेरा पोलिस स्टेशन सर्वोत्कृष्ट ठरले.

गडचिरोली जिल्ह्रामध्ये विविध ठिकाणी कार्यरत असलेले 10 पोलीस निरीक्षक, 5 सहायक पोलीस निरीक्षक आणि 32 पोलीस उपनिरीक्षकांची बदली झालेली आहे. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करताना आलेले अनुभव कथन केले. तसेच गडचिरोलीसारख्या माओवाद प्रभावीत जिल्ह्रात कशाप्रकारे आव्हानांना सामोरे जावे लागते व याठिकाणी केलेल्या खडतर कामाचा अनुभव नक्कीच भावी वाटचालीसाठी उपयोगी पडेल असे म्हणत गडचिरोली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या जिल्ह्यात बजावलेल्या उत्कृष्ठ कामगिरीकरीता अभिनंदन करून भविष्यात अशीच कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचवाल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या अधिकारी, पोलिस स्टेशनचा झाला सन्मान

यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट व विशेष कामगिरीसाठी ‘कम्युनिटी डेव्हलेपमेंट ऑफीसर ऑफ द इयर-2023’ या सन्मानाने गौरविण्यात आले. त्यात उत्कृष्ट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय म्हणून उपविभाग पेंढरीची निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांना 10,000 रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पोलीस स्टेशन म्हणून मुलचेरा, द्वितीय क्रमांक सिरोंचा, तृतीय क्रमांक पुराडा पो.स्टे.यांनी पटकाविला. तेथील प्रभारी अधिकाऱ्यांना अनुक्रमे 10,000 रुपये रोख व प्रशस्तीपत्र, 8,000 रुपये रोख व प्रशस्तीप्रत्र, 6,000 रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पोस्टे कोटगुल, भामरागड, पोमकें मालेवाडा, उप-पोस्टे जिमलगट्टा व पोस्टे मन्नेराजाराम यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 5,000 रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करीता पोमकें ताडगाव, विशेष कामगिरी (कृषी समृद्धी योजना) करिता पोस्टे मुरुमगाव, तसेच उत्कृष्ट कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता पोमकें बेडगाव, विशेष कामगिरी (रोजगार व स्वयंरोजगार) करीता उप-पोस्टे दामरंचा, उत्कृष्ट कामगिरी (शासकिय योजना) करीता उप-पोस्टे राजाराम (खां.), विशेष कामगिरी (शासकिय योजना) करिता पोमकें घोट यांना सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट नाविन्यपूर्ण योजनेकरीता पोलीस स्टेशन कोटगुल यांनाही रोख 5,000 रुपये व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.