वाहत्या नदीत उडी मारणाऱ्या महिलेचे पोलिसांच्या पथकाने वाचविले प्राण

कठडे नसलेल्या पुलावरून थेट पात्रात

भामरागड : येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून वाहत्या नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथकाने (क्युआरटी) वाचवत जीवदान दिले. त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढत रुग्णालयात भरती करण्यात आले. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

सविस्तर असे की, भामरागड येथील सदर महिला विवाहित असून तिला दोन मुलं असल्याचे समजते. कौटुंबिक तणावातून ती पर्लकोटा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्यासाठी गेली होती. नदीवरील जुन्या पुलाला कठडेच नसल्यामुळे कोणीही सहजपणे नदीत उडी घेऊ शकतो. त्यामुळे तिने नदीत उडी घेताच तिला पाहणाऱ्या लोकांनी आरडाओरड करत तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ पोलिसांच्या भामरागड येथील जलद प्रतिसाद पथकाशी संपर्क केला.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली क्षणाचाही विलंब न करता क्युआरटीच्या जवानांची एक छोटी तुकडी मदतीसाठी रवाना करण्यात आली. या जवानांनी सदर महिलेला वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. महिला घाबरलेली आणि अस्वस्थ असल्याने तिला त्वरीत भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता भरती केले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि क्युआरटी पथकाच्या प्रसंगावधानाने त्या महिलेचे प्राण वाचू शकले.

ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात नायक पो.अंमलदार योगेंद्र सेडमेक, संपत गंड्राकोटा, शंकर हबका व सुरेश कुडयेटी यांनी केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत समाजाशी आपुलकीचे नाते जपत पोलिसांनी दाखविलेल्या या साहसी कृतीचे भामरागड येथील नागरीकांनी कौतुक केले.