922 जागांसाठी 21 हजार उमेदवार उतरले पोलिस भरतीच्या मैदानात

हजारो युवक-युवती धावले अनवाणी

गडचिरोली : पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई व चालक पदाच्या वर्ष 2022-2023 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2024) मधील एकूण 922 जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत उमेदवारांची मैदानी (शारीरिक क्षमता) चाचणी सुरळीतपणे पूर्ण झाली. 19 जून ते 13 जुलै 2024 यादरम्यान पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर झालेल्या या चाचण्यांसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॅानिक्स उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांनी उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवून ही भरती अतिशय पारदर्शीपणे झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

मुंबई पोलिस आयुक्तालयानंतर जिल्हा पोलिस दलांमध्ये सर्वात मोठी पोलीस भरती गडचिरोली जिल्ह्यात होत आहे. 922 जागांसाठी जवळपास 28 हजार युवक-युवतींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 21 हजार 570 उमेदवार भरतीसाठी हजर झाले. त्यातून 18 हजार 673 उमेदवारांनी प्रत्यक्षात सर्व चाचण्या दिल्या. विशेष म्हणजे 1600 मीटरपर्यंतच्या धाव चाचणीत (रनिंग टेस्ट) बहुतांश उमेदवार पायात शूज न घालता अनवाणी पायांनी धावत असल्याचे दिसत होते. पावसाने अनेक वेळा व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला असला तरी मैदानावर योग्य ती खबरदारी घेतल्याने केवळ एक दिवस भरती प्रक्रिया पुढे ढकलावी लागल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

चालक पदासाठीच्या उमेदवारांची वाहन कौशल्य चाचणी एम.आय.डी.सी. मैदानावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली (आरटीओ) यांच्या समक्ष पार पडली. शिपाई पदासाठीची पदभरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पुर्णपणे पारदर्शक पध्दतीने करण्यात आली. यामध्ये उमेदवारांची छाती-उंची या शारीरिक मोजणीकरीता पीएसटी (PST) (Digital Physical Standard Test) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तसेच उमेदवारांची 1600 मी.धावणे (पुरुष), 800 मी.धावणे (महिला), 100 मी.धावणे (पुरुष व महिला) या चाचणीकरीता (RFID) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यासोबतच गोळाफेक चाचणीकरीता Prism Technology चा वापर करण्यात आला. उमेदवारांना मैदानी चाचणीदरम्यान काही दुखापत झाल्यास तात्काळ उपचार होण्याकरीता मैदानातच रुग्णालयाची सोय करण्यात आली होती. इतर काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण पोलीस अधीक्षक यांच्यासमक्ष प्रत्यक्षरित्या करण्यात आले.

मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या 28 जुलै रोजी होऊ शकते. त्यासाठी एका जागेसाठी 10 यानुसार उमेदवारांना पाचारण केले जाणार आहे. मैदानी चाचणी दिलेल्या सर्व उमेदवारांच्या गुणतालिकेची यादी व लेखी परिक्षेकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी, तसेच लेखी परिक्षेची तारीख लवकरच गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.