पोलिस अधिकारी, अंमलदारांच्या तंदुरूस्तीसाठी सभागृहातच इनडोअर खेळांची सुविधा

अपर पोलिस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : पोलिस दलात कार्यरत असलेला प्रत्येक पोलिस अधिकारी आणि जवान हा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावा, तसेच त्यांची आणि त्यांच्या पाल्यांची खेळाप्रती आवड निर्माण होऊन त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे यासाठी गडचिरोली पोलिस मुख्यालयात पोलिस कल्याण बहुउद्देशिय सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले. त्या सभागृहाचे, तसेच पोलिस क्वॅार्टर्स परिसरातील सरस्वती विद्यालय प्रि-स्कुलचे उद्घाटन शुक्रवारी (दि.24) अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) प्रविण साळुंके यांच्या हस्ते झाले. यावेळी गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिस कल्याणच्या या सभागृहात टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्नुकर, बुद्धीबळ, कॅरम व इतर इनडोअर खेळांकरीता आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.

चिमुकल्या मुलांसह पोलिस कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

सरस्वती विद्यालयातील प्रि-स्कुलच्या उद्घाटन समारंभात अपर पोलिस महासंचालकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मिठाईचे वाटप केले. यानंतर आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लाभ घेतला पाहीजे. दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी गडचिरोली पोलिस दलातील जवानांना नक्षलविरोधी अभियानादरम्यान दाखविलेल्या शौर्याकरिता शासनाकडून विविध पदकं प्राप्त होत असतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश तसेच सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी केतकर, तसेच इतर पोलिस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.