हेलिकॉप्टरने 80, तर बसने 359 पथके मतदानासाठी बेसकॅम्पवर पोहोचली

बुधवारी 462 मतदान पथके रवाना

गडचिरोली : गडचिरोली लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी निवडणूक विभागातर्फे मतदान अधिकाऱ्यांची पथके मंगळवारपासून बेसकॅम्पसाठी रवाना करणे सुरू आहे. बुधवारी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेले एकूण 462 पथके रवाना करण्यात आली. त्यातील 80 पथके हेलिकॉप्टरद्वारे पाठविण्यात आली आहेत. बुधवारी संध्याकाली जिल्हाधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यांनी निवडणूक तयारीची सविस्तर माहिती दिली.

जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात हेलिकॉप्टरद्वारे 80 पथके रवाना करण्यात आली. यात आरमोरी येथील 40, गडचिरोलीतून 12 आणि अहेरी येथील 28 पथकांचा समावेश आहे. बसद्वारे आरमोरी येथून 84, गडचिरोलीतून 183 व अहेरी येथून 92 पथके, तथा जीपद्वारे आरमोरी विधानसभा मतदार संघातून 3, गडचिरोली येथून 19 आणि अहेरी येथून एक पथक रवाना करण्यात आले. प्रत्येक पथकासोबत झोनल अधिकारी देखील रवाना झाले आहेत.

दुर्गम भागात नक्षलवाद्यांचा धोका पाहता 16 एप्रिलपासून निवडणूक पथके बेसकॅम्पवर पाठविण्यात येत आहेत. याअंतर्गत अहेरी येथून 68 मतदान पथकांना हेलिकॉप्टरने रवाना करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण 1891 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात आमगाव 311, आरमोरी 302, गडचिरोली 356, अहेरी 292, ब्रम्हपुरी 316 तर चिमूर विधानसभा मतदारसंघात 314 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील 319 मतदान केंद्रे संवेदनशील तर 200 केंद्र अतिसंवेदनशील व 16 मतदान केंद्रांचे अतिसंवेदनशील असे वर्गीकरण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अतिरिक्त विभागीय आयुक्तांचा पथकांशी संवाद

बुधवारी सकाळी गडचिरोली येथील एमआयडीसी मैदानाच्या हेलिपॅडवर अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी हेलिकॉप्टरने बेसकॅम्पवर जाणाऱ्या पथकातील मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधला. केंद्राध्यक्ष कोण आहे, टिममध्ये कोण-कोण आहेत, कोणत्या मतदान केंद्रावर ड्युटी आहे, तिथे जाण्यासाठी किती अंतर पायी जावे लागेल, निवडणूक विभागाद्वारे जेवण, नाश्ता देण्यात आला आहे का, हेलिकॉप्टरने यापूर्वी गेले आहेत का, याबाबत आस्थेने विचारपूस करून माहिती घेतली. एकमेकांना मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके हे यावेळी उपस्थित होते.