गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास कालपासून (रविवार) सुरूवात करण्यात आली. अहेरी मतदारसंघात 76 निवडणूक पथकातील 304 मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह भारतीय वायुसेनेच्या एमआय-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने 14 ठिकाणच्या बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहोचविण्यात आले. यावेळी निवडणूक विभागाद्वारे मतदान पथकातील अधिकाऱ्यांचे बँडबाजा, पुष्पहार व औक्षण करून स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली व अहेरी या तीन विधानसभा मतदार संघातील 972 मतदान केंद्रांपैकी 211 मतदान केंद्रांवर 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व मतदान साहित्य पोहचविण्यात येणार आहे. अहेरीत 44 पथकांना एअर लिफ्ट करण्यात येत आहे. गडचिरोली मतदारसंघात 18 नोव्हेंबर रोजी 13 पथके तर आरमोरी मतदार संघात 18 नोव्हेंबर रोजी 39 पथके आणि 19 नोव्हेंबर रोजी 14 पथके हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येणार आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने व पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहोचविण्यात येत आहे.