गडचिरोली : रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाला प्राधान्य देत गोंडवाना विद्यापीठाने लॅायड्स मेटल्सच्या सहकार्याने विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था सुरू केली आहे. याअंतर्गत यावर्षीपासून अभियांत्रिकी पदविका (पॅालिटेक्निक) या तीन वर्षीय अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला जात आहे. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक रोजगाराची संधी मिळणाऱ्या ‘मायनिंग’ (कोड 402670110U) या विषयासह कॅाम्प्युटर सायन्स (402624210U), मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॅालॅाजी (402663010U) आणि मेटलर्जीकल इंजिनिअरिंग (402669210U) अशा चार वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन परिसरात हे पॅालिटेक्निक कॅालेज राहणार आहे. लॉईड्स मेटल्स कंपनीच्या सहकार्याने विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेला वर्ष 2025-26 पासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यास भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या 3 वर्षीय पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी 8 ते 10 जुलै 2025 यादरम्यान पहिला राऊंड होणार आहे. दहावी उत्तीर्ण व DTE पोर्टलवर नोंदणी केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आपला पर्याय भरू शकतील. विशेष म्हणजे यातील 70 टक्के जागा गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत.
या अभ्यासक्रमाचा पर्याय भरण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थी मदत केंद्र स्थापित करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे प्रभारी संचालक प्रा.मनीष उत्तरवार (9822469609) यांनी केले आहे.