गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये 11 नोव्हेंबरपासून टपाली मतदानाला सुरूवात आली. सुरूवातीचे 3 दिवस, म्हणजे बुधवारपर्यंत पोलीस आणि होमगार्डचे मतदान घेण्यात आले. त्यात 2705 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या कामाची जबाबदारी मिळालेल्या आणि अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत टपाली मतदान करता येणार आहे.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघात 11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस व होमगार्डच्या जवानांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. गडचिरोली येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक मतदान सुविधा केंद्र तर तहसील कार्यालयात दोन मतदान सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात कार्यरत असलेले गडचिरोली जिल्ह्यातील, तसेच बाहेर जिल्ह्यातील पोलीस व होमगार्ड मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी बुधवार 13 व गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी येथील गोकुळ नगरातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान सुविधा केंद्रात मतदान होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार दि.14 ते शनिवार दि.16 नोव्हेंबर या कालावधीत येथील तहसील कार्यालयातील मतदान सुविधा केंद्रावर मतदान होणार आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी रविवार दि.17 ते मंगळवार दि.19 नोव्हेंबर या कालावधीत, प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना होण्यापूर्वी चंद्रपूर मार्गावरील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मतदान सुविधा केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणूक कर्तव्यावर नेमलेले 1 हजार 567 कर्मचारी टपाली मतदान करणार आहेत
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली टपाली मतपत्रिका शाखेचे पथक प्रमुख तथा गडचिरोली नगरपरिषेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांच्या नियंत्रणात नेमलेल्या पथकाकडून टपाली मतदानाचे काम सुरू आहे.
पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांचे उत्साहात मतदान
तीनही विधानसभा मतदारसंघात दि.11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. त्यात आरमोरी मतदार संघात 162 पैकी 158 पोलीस कर्मचाऱ्यांनी, तर 175 पैकी 158 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले. एकूण 337 पैकी 316 कर्मचाऱ्यांचे येथे मतदान झाले. गडचिरोली मतदार संघात 1324 पैकी 1136 पोलीस कर्मचाऱ्यांनी तर 147 पैकी 50 होमगार्ड कर्मचाऱ्यांनी मतदान केले. एकूण 1471 पैकी 1186 कर्मचाऱ्यांचे मतदान झाले आहे. अहेरी मतदार संघात 1806 पैकी 1206 पोलीस कर्मचाऱ्यांनी मतदान केले. होमगार्ड कर्मचाऱ्यांचे मतदान 18 व 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.