मान्सूनपूर्व पावसाने जिल्हावासियांची तारांबळ, एकाचा मृत्यू, दोन गुरे ठार

रात्रभर सुरू होता वीजेचा लपंडाव

गडचिरोली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून उकाडा आणि उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत असताना बुधवारच्या संध्याकाळी बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सर्वांना ओलेचिंब करत वातावरणातील उकाडा पळवला. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच असल्याने उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आरमोरी तालुक्यातील वनखी येथील शिवारात वीज पडल्याने केवळराम गेडाम या गुराख्याला जीव गमवावा लागला. याशिवाय डोंगरसावंगीतील शेतकऱ्याचा बैल आणि गोऱ्हा ठार झाला.

विशेष म्हणजे पावसादरम्यान किंवा त्यापूर्वी जोराचा वारा नव्हता. तरीही गडचिरोलीत रात्रभर अनेक भागातील नागरिकांना विजेचा लपंडाव सहन करावा लागला. त्यामुळे महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल व्यवस्थित केली नाही का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. एकीकडे भरमसाठ वीज बिलाची आकारणी केली जात असताना अखंडित वीज पुरवठा देण्यात महावितरण अयशस्वी ठरत असल्याने वीज ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

उघड्यावरील धान भिजला

आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला लाखो क्विंटल धान अजूनही ठिकठिकाणच्या खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेला आहे. या धानाची भरडाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे तो धान भिजून खराब होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी या उघड्यावरील धानाची भरडाई होणे गरजेचे होते. पुरेशा गोदामांअभावी आदिवासी विकास महामंडळाला दरवर्षी धान उघड्यावर ठेवावा लागतो. यातून मोठ्या प्रमाणात तूट येऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसानही होते.