सार्वजनिक जागेवर बॅनर्स, पोस्टर, झेंडे लावताना ‘हे’ नियम जरूर वाचा

कलम 33 अन्वये मनाई आदेश जारी

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र आता प्रचाराला सुरूवात होईल. उमेदवारांचे बॅनर, पोस्टर आणि पक्षांचे झेंडे लावले जाईल. परंतू सार्वजनिक ठिकाणी किंवा खासगी जागेतही हे प्रचार साहित्य लावताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनजीवन सुरळीत राहण्यासाठी, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी, तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 33 (2) (प) अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार

रस्ता व सार्वजनिक जागेवर बॅनर्स लावणे, फलक लावणे, खांबावर झेंडे लावणे, घोषणा लिहिणे, कमान, पताका, कटआऊट लावणे यावर बंधन राहणार आहे. अनेक वेळा दोऱ्या. काट्या व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येवून रहदारीस अडथळा निर्माण होतो. प्रचारादरम्यान अशा किरकोळ कारणांवरून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन वाद होतात. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो व शांततेचा भंग होवू शकतो. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल अशा रितीने कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर बॅनर्स लावणे, फलक लावणे, खांबावर झेंडे लावणे यास निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंध घातला आहे.

सदर निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने खाजगी इमारत अथवा आवारात झेंडे उभारणे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर लावणे, नोटीसा चिटकविणे व घोषणा लिहिणे इत्यादी वापर करावयाचा असल्यास प्रथम जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधणकारक आहे. तसेच सदर पोस्टर, झेंडे, बॅनर्स, जाहीराती, कापडी फलक, घोषणा, नोटीसा चिटकविताना आवश्यकतेप्रमाणे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेवून संबंधितांना त्याबाबतची माहिती द्यावी. सदर लेखी परवानगी संबंधित पोलीस ठाण्याला दाखवुन पोलिसांचा नाहरकत दाखला घेणे देखील बंधनकारक राहील.

हा आदेश 25 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 131 प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे.