चामोर्शी : शहरातील महिला महाविद्यालयाच्या पटांगणात स्वर्गीय स्वप्नील वरघंटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते उपस्थित होते. त्यांनी फित कापून आणि चेंडू टोलवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना अशोक नेते म्हणाले, ‘स्वप्निल माझ्यासाठी लहान भावाप्रमाणे होता. तो सदैव कोणत्याही कामासाठी तत्पर असायचा. त्याची कार्यक्षमता आणि समर्पण हनुमानासारखे होते. त्याचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. त्याच्या स्मृतीला साजेसा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे. स्पर्धेच्या आयोजक आणि खेळाडूंना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.’
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, तसेच या स्पर्धेच्या आयोजक नगरसेविका रोशनी वरघंटे यांच्यासह भाजपचे युवा तथा ओबीसी नेते भास्कर बुरे, नरेश अल्सावार, निरज रामानुजवार, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उमेश अग्रवाल, वासुदेव चिचघरे, रेवनाथ कुसराम, भाविक आभारे, गजानन बारसागडे, शेषराव कोहळे, संतोष भांडेकर, पोषक गेडाम व इतर मान्यवर उपस्थित होते.