20 पासून प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा, आयकॅान खेळाडूंही होणार सहभागी

उद्घाटनाला अझहरूद्दीन, श्रुती मराठे

गडचिरोली : विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबच्या वतीने येथील जिल्हा स्टेडिअमवर येत्या 20 जानेवारीपासून गडचिरोली प्रिमिअर लिग (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि काँग्रेस नेते मो.अझहरूद्दीन आणि मराठी अभिनेत्री श्रुती मराठी येणार असल्याची माहिती फॅन्स क्लबचे बंडू शनिवारे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री, माजी विरोधीपक्ष नेते आ.विजय वडेट्टीवार राहणार असून प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, खा.डॅा.नामदेव किरसान, आ.मिलिंद नरोटे, आ.रामदास मसराम, आ.अॅड.अभिजित वंजारी, आ.सुधाकर अडबाले, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

गडचिरोली प्रिमिअर लिगचे हे आठवे पर्व आहे. यावर्षी देशातील सहा आयकॅान खेळाडू प्रत्येक संघात खेळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 24 सामने खेळविले जाणार आहेत. विजेत्या संघाला प्रथम 5 लाख, द्वितीय 3 लाख तर तृतीय 1 लाख याप्रमाणे बक्षिसे राहणार आहेत. याशिवाय वैयक्तिक बक्षिसांची लयलूट राहणार असल्याचे सांगण्यात आले.

पत्रपरिषदेला विजय वडेट्टीवार फॅन्स क्लबचे अजय बर्लावार, मंगेश देशमुख, राहुल निलमवार, विनोद मैंद, मनिष वाळके, अनुराग कुडकावार, प्रसाद कवासे आदी उपस्थित होते.