क्रिकेटप्रमाणे थ्रो-बॉलच्या प्रिमियर लीगचे आयोजन करण्यावर मंथन

डॉ.नेते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

गडचिरोली : महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीची बैठक मुंबईतील वीर सावरकर स्मारकात घेण्यात आली. महाराष्ट्र थ्रो-बॉल असोसिएशनचे अध्यक्ष असलेले माजी खासदार डॅा.अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी थ्रो बॅाल या खेळाचा सर्व स्तरावर प्रसार करण्यासाठी प्रिमियर लीगचे आयोजन करण्यावर विचारविनिमय करण्यात आला.

प्रिमियर लीगच्या माध्यमातून राज्यभरातील खेळाडूंना संधी मिळावी आणि थ्रो बॉल हा खेळ अधिक लोकप्रिय व्हावा, यासाठी यासंदर्भात मंथन करण्यात आले. त्यासाठी लवकरच नियोजनही केले जाणार आहे.

यावेळी असोशिएशन अध्यक्ष डॉ.अशोक नेते यांनी सांगितले की, थ्रो बॉल हा खेळ राज्यात अधिक व्यापक प्रमाणात पोहोचावा आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही या खेळाचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच, थ्रो बॉलच्या प्रसारासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला प्रामुख्याने असोशिएशनचे उपाध्यक्ष डॉ.राकेश तिवारी, उपाध्यक्ष अरुण हरडे, सचिव राहुल वाघमारे, संयुक्त सचिव डॉ.प्रसाद कुलकर्णी, अमर भांडारवार, प्रियंका धुरी, सदस्य दीपक कदम, गजेंद्र जाधव, गणेश यादव आणि शिषिर हलदार उपस्थित होते.

थ्रो बॉल हा खेळ जलदगतीने खेळला जाणारा आणि संघभावना वाढवणारा खेळ आहे. भारतात विशेषतः शालेय व महाविद्यालयीन पातळीवर याचा प्रसार वाढत आहे. या खेळात फिटनेससोबतच खेळाडूंच्या सहकार्याच्या कौशल्याचीही कसोटी लागते. याच कारणामुळे थ्रो बॉलच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र थ्रो बॉल असोसिएशनचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे डॅा.नेते यांनी सांगितले. बैठकीतील निर्णयांमुळे महाराष्ट्रातील थ्रो-बॉलपटूंना नवीन संधी उपलब्ध होतील आणि हा खेळ भविष्यात अधिक लोकप्रिय होईल, असा विश्वासही असोशिएशनचे अध्यक्ष मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी व्यक्त केला.