
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा देव येथे महाशिवरात्री निमित्ताने दि.15 फेब्रुवारीपासून भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मार्कंडा येथे समन्वय बैठक घेऊन आढावा घेतला. भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मार्कंडा देव येथील धर्मशाळेत झालेल्या या बैठकीत मार्कंडादेव, पळसगाव आणि चपराळा येथे भरणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसंबंधाने नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपविभागीय अधिकारी एम.अरुण, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, पोलीस व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यावेळी म्हणाले, इतर राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक मार्कंडा देव यात्रेला येतात. त्यामुळे भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेत सर्व विभागांनी प्रशासनाला सहकार्य करावे. यात्रा यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यात्रेच्या नियोजनाचा माहिती घेऊन सर्व विभागांना आवश्यक सूचना दिल्या. यात्रेच्या कालावधीत केंद्रीकृत नियंत्रण कक्ष उभारणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे तसेच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
तात्पुरत्या दुकानांसाठी एक खिडकी योजनेअंतर्गत परवाने देण्याची कार्यवाही सुलभ करावी, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छतेबाबत योग्य व नियमित कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन विभाग, चामोर्शी नगर पंचायत व अग्निशमन विभाग यांच्यामार्फत अग्निसुरक्षा, स्वच्छता व मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रेपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजीची कामे तातडीने पूर्ण करावीत. आरोग्य विभागाने वैद्यकीय पथके, औषधोपचार सुविधा व रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. तसेच विद्युत विभाग, वनविभाग, अन्न व औषध प्रशासन, पुरातत्त्व विभाग, मंदिर ट्रस्ट, चिचडोह बॅरेज प्रशासन व एस.टी. महामंडळ अशा सर्व संबंधित विभागांनी आवश्यक त्या ठिकाणी आपापले नियंत्रण कक्ष उभारून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या सर्व उपाययोजना यात्रा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीदरम्यान उपस्थित नागरिकांनी यात्रेसंदर्भात विविध सूचना मांडल्या. या सूचनांचा सकारात्मक विचार करून प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी केले.
तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी प्रस्ताविकातून यात्रेच्या आयोजनाची व सोयी सुविधांची माहिती दिली. बैठकीला विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
































