मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची तयारी, कोनसरीत भव्य वॅाटरप्रुफ मंडप

मा.खा.अशोक नेते यांनी केली पाहणी

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.च्या एकात्मिक स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन आणि हेडरीतील पॅलेट प्लान्ट प्रकल्प आणि स्लरी पाईपलाईनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी कोनसरीतील लॅायड्स मेटल्सच्या प्लान्ट परिसरात भव्य असा वॅाटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. माजी खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनु.जनजाती मोर्चा) डॅा.अशोक नेते यांनी रविवारी कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारीची पाहणी केली.

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॅायड्सकडून उभारला जात असलेला स्टिल प्लान्ट गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासातील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन लॅायड्स व्यवस्थापनाकडून केले जात आहे.

दरम्यान मा.खा.डॅा.नेते यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक ते मार्गदर्शनही केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, लॅायड्सचे कार्यकारी संचालक एस.व्यंकटेश्वरन, बलराम सोमनानी, वेदांश जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोनसरी प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.