Home दैनंदिन बातम्या 14 केंद्रांवर 7003 उमेदवार देणार पोलीस शिपाईपदाची लेखी परीक्षा

14 केंद्रांवर 7003 उमेदवार देणार पोलीस शिपाईपदाची लेखी परीक्षा

चालक पदासाठी 389 जणांची हजेरी

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेतील पहिला टप्पा असलेल्या मैदानी चाचण्या यशस्वीरित्या पार केल्यानंतर आता लेखी परीक्षेचे नियोजन केले जात आहे. त्यात बुधवारी (दि.18) चालक पोलीस शिपाई पदाच्या 27 जागांसाठी लेखी परीक्षा झाली. त्याला 389 महिला-पुरूष उमेदवारांनी उपस्थिती लावली. आता दि.22 ला होणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी 7003 उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. त्यांची एकाचवेळी शहरातील 14 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

बुधवारी झालेली चालक पदाची लेखी परीक्षा अत्यंत शिस्तप्रिय व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यात आली. सकाळी 10 वाजता पहिला पेपर सामान्य अध्ययन घेण्यात आला. दिड तासाच्या या पेपरनंतर दुसरा पेपर गोंडी व माडिया या भाषांचा झाला. तो दुपारी 1 ते 2.30 या दिड तासात घेण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

ही लेखी परीक्षा पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात घेण्यात आली. या लेखी परीक्षेच्या बंदोबस्ताकरीता एकूण 72 पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणुक करण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेपासून कोणतेही पात्र उमेदवार वंचित राहू नये म्हणून वेळोवेळी सोशल मिडीयामार्फत गडचिरोली पोलीस दलाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. (अधिक बातमी खाली वाचा)

लेखी परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता उमेदवारांना प्रवेश देतानाच कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधनांबाबत मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी करूनच प्रवेश देण्यात आला. यासोबतच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणीचे पुन:परिक्षण करुन त्यांना परीक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले. तसेच पेपर क्र.1 व पेपर क्र.2 च्या मधल्या वेळेत उमेदवारांसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊन पारदर्शक पद्धतीने सदर परीक्षा पार पडली. (अधिक बातमी खाली वाचा)

लेखी परीक्षा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक (गडचिरोली) अनिकेत हिरडे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.